पुणे : एकीकडे मराठा आरक्षणाच्या संदर्भातून मनोज जरांगे उपोषण करीत आहेत तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण नको अशी मागणी करत लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरु केले आहे.
दरम्यान जरांगे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत देत उपोषण स्थगित केले आहे. एकूणच मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पुढे आला. यावरून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राजकीय स्वार्थापोटी समाजात तुकडे पाडले जात आहेत, हे बरोबर नाही. अनेक संत महतांनी समाज एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काहीजण राजकीय स्वार्थासाठी तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राजकारणात तेल टाकण्याचे काम करू नका. तुम्ही देखील यात भस्म व्हाल. मराठा आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनी दिले. परंतु, ते न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर आधीच्या त्रुटी सुधारून दहा टक्के आरक्षण दिले गेले. शरद पवार हे ५० वर्षे राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू होते. तेव्हा मराठा आरक्षण का दिले नाही “, अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच ओबीसी आणि मराठा नेत्यांमध्ये एक बैठक घेणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी केली.