
🔰 खेड विधानसभेत ठाकरे गटाचा शिलेदार होणार आमदार
✅ आमदार मोहिते पाटील विरोधात माजी आमदार गटांचा रंगणार सामना
राजगुरुनगर (प्रतिनिधी)
काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत खेड – आळंदी विधानसभा मतदार संघातून सध्याचे तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे महायुती म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार गटातून उमेदवार असणार आहेत. त्यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांचा आमदार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक विरोधक असणाऱ्या शिवसेनेच्या ठाकरे गटांनी मोलाची साथ मिळाली. यामध्ये माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार यांच्या गटाचे प्राबल्य सर्वाधिक दिसून आले.
खेड तालुक्यात बळकट आणि तेवढेच चिवट संघटन असलेली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रचारात आघाडीवर राहिलेली होती. असे असले तरी लोकसभेच्या फॉर्म्युला प्रमाणे आघाडीच्या जागा वाटपात खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यमान आमदार दिलीप मोहिते यांच्यासमोर शरद पवार गटाकडून सक्षम चेहरा नाही. याउलट पारंपारिक विरोधक शिवसेनेकडून अनेक मातब्बर चेहरे विधानसभेच्या मैदानात उतरणार आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे पहिल्यांदाच माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या रूपात प्रतिनिधित्व केले होते. तसेच लोकसभा निवडणुकीत नेहमीच खेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या खासदारांना नेहमी मताधिक्य मिळवून दिले आहे.
खेड तालुका पुणे जिल्ह्याच्या राजकिय जाणकारांच्या चर्चेतील मतदारसंघ आहे. लोकसभेला प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमोल पवार, अशोक खांडेभराड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, मी सेवेकरी फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधिर मुंगसे, मा. सभापती रामदास ठाकुर, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बाबा राक्षे यांची नावे विधानसभेसाठी चर्चेत आली आहे.
खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघात मागील ४० वर्षांचा राजकिय प्रवास विचारात घेता स्वर्गीय आमदार नारायण पवार यांनी तब्बल २० वर्षे विधानसभेचे प्रतिनिधित्व केले होते. तर माजी आमदार स्व. सुरेश गोरे हे सन २०१४ मध्ये शिवसेनेकडून आमदार झाले होते. त्यापुर्वी २००४, २००९ आणि २०१९ मध्ये दिलीप मोहिते पाटील संघर्षातून घडलेले कणखर नेतृत्व प्रतिनिधित्व करत आहे.
अमोल पवार हेच खेडसाठी सक्षम उमेदवार…
स्व. नारायणराव पवार हे सलग २० वर्षे खेडच्या राजकारणात सक्रिय व एकहाती सत्ता होती. आता स्व. आमदार नारायण पवार यांचे वारसदार अमोल गुलाबराव पवार हे खेडच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असणारे नाव आहे. खेड मतदारसंघात स्व. नारायण पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही मानणारा मोठा वर्ग आहे. या दोन्ही वर्गाना सोबत घेत राजकीय पटलावर मोट बांधण्याचे काम युवानेते, माजी उपसभापती अमोल गुलाबराव पवार यांनी करत आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले आहे.
तसेच आमदार दिलीप मोहिते यांच्या राजकीय विरोधकांना एकत्र करून त्यांची मोट बांधण्याचे कौशल्य अमोल पवार यांनी करून आपले राजकीय कौशल्य सिद्ध केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अमोल पवार यांच्या रूपात शिवसेनेला दुसरा आमदार मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे.
