
पिंपरी – जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण गुरुवार, दि. १ ऑगस्ट २०२४ पर्यंत ९०.९२ टक्के भरले आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ३० जुलैचा पाणीसाठा विचारात घेतला जातो. पुढील वर्षी ३० जुलैपर्यंत पाणी पुरेल इतका साठा सध्या धरणात असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे शहराची पाण्याची चिंता मिटली आहे.
पिंपरी-चिंचवडला जुलैअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा गृहीत धरला जातो. जुलैअखेरपर्यंत झालेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ होत असते. धरण ९०.९२ टक्के भरले आहे. पावसाळा लांबल्यास साठा विचारात घेऊन पाण्याचे नियोजन केले जाते.
– समीर मोरे, अभियंता, पवना धरण
——————————–
पावसामुळे दिलासा
जूनसह जुलै महिन्याचे पहिले दोन आठवडे पावसाने दडी मारली होती. मात्र, २० जुलैनंतर धरण क्षेत्रासह घाटमाथा व मावळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तीनच दिवसात धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने दिलासा मिळाला आहे.
शहरातील भोसरी मतदारसंघात पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी आंध्र धरणातून पाणी आणण्याचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. आंद्रा धरणातील प्रतिदिन ८५ ते ९० एमएलडी पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे येथील बंधाऱ्यातून उचलले जात आहे.
त्यांवर चिखली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून चिखली, मोशी, डुडुळगाव, चहोली, दिघी, भोसरी परिसरात वितरित केले जात आहे. तर, पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून प्रतिदिन ५१० एमएलडी अशुद्ध जलउपसा केला जात आहे. त्यावर प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून वितरित केले जात आहे. शिवाय ‘एमआयडीसी’कडून प्रतिदिन ३० एमएलडी पाणी महापालिका घेत आहे.
