
- आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा आठव्यांदा जिंकणाऱ्या भारतीय कबड्डी संघाचे अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
- अष्टपैलू कामगिरी करत भारतीय संघाचा जगात दबदबा कायम
मुंबई, दि.30: आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने यंदा सुद्धा शानदार कामगिरी करत आठव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरत देशाची मान उंचावली आहे. कबड्डीत अजिंक्यपद कायम राखत जगभर आपला दबदबा कायम राखणाऱ्या भारतीय कबड्डी संघाचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे, अशा शब्दात भारतीय कबड्डी संघाच्या सर्व खेळाडू, प्रशिक्षकांसह व्यवस्थापकांचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित करण्यात आलेल्या आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने अजिंक्यपद पटकावले. अंतिम फेरीत भारतीय संघाने इराणच्या संघावरवर 42-32 अशी सरळ मात करत आठव्यांदा आशियाई अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.
भारतीय संघाच्या विजयात महाराष्ट्राचा सुपुत्र अस्लम इनामदारचा मोलाचा वाटा आहे. अंतिम फेरीत सुरुवातीला इराणच्या संघाने आघाडी घेतली होती. मात्र टीम इंडियाने झुंझार खेळ करत सामन्यात पुनरागमन केले. स्पर्धेत सुरुवातीपासून चांगल्या लयीत असलेल्या भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत इराणी संघावर मात करत जगात आपल्या नावाचा दबदबा कायम राखला आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी भारतीय कबड्डी संघाचे अभिनंदन केले आहे.
