पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या आता सुटणार आहे. विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर या दरम्यानचा उड्डाणपूल खुला करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी सकाळी ७ वाजता या एकेरी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे राजाराम पुलाकडून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे.
विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर यादरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही केवळ उद्घाटनासाठी केवळ नेत्यांची वेळ मिळत नसल्याने तो वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, यासाठी भाजपची नेतेमंडळी प्रयत्नशील होती. उद्घाटनाचा मुहूर्त ठरल्याचेही भाजपकडून सांगण्यात येत होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी, दि.२७ एप्रिल रोजी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यातच दोन दिवस मुख्यमंत्री शहरात होते. त्यामुळे उड्डाणपुलाचे उद्घाटन होईल, अशी आशा होती. मात्र, उद्घाटन झाले नाही. त्यामुळे समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली. त्यानंतर सूत्रे हलली आणि उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे.




