
पुणे : कोटक महिंद्रा बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये २०० रुपयांच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आल्या होत्या. त्यावरुन बनावट नोटा छापणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी २८ लाखांच्या ५०० व २०० रुपये दराच्या नोटा जप्त केल्या. तसेच नोटा छापण्याचे मशीन व साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
मनीषा स्वप्नील ठाणेकर (वय ४२, रा. नागपूर चाळ, येरवडा), भारती तानाजी गवंड( वय ४४, रा. मोर्या गोसावी, केशवनगर, चिंचवड), सचिन रामचंद्र यमगर (वय ३५, रा. गहुंजे), नरेश भिमप्पा शेट्टी (वय ४०, रा. लोहगाव) प्रभू लक्ष्मण गुगलजेड्डी (वय ३४, रा. विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल यांनी माहिती दिली कोटक महिंद्र बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये १७ एप्रिल रोजी २०० रुपयांच्या ५५ बनावट नोटा जमा करण्यात आल्या होत्या. त्याचा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना बँकेत कोणत्या खात्यातून ही रक्कम भरली गेली तेथून तपासाला सुरुवात झाली. खातेधारकाने या नोटा खर्या असल्याचे समजून त्या खात्यात भरल्या होता. त्या व्यक्तीला ही रक्कम आरोपी मनीषा ठाणेकर हिने दिल्याचे चौकशीस उघडकीस आले. पोलिसांनी मनीषा ठाणेकर हिला ताब्यात घेतल्यानंतर टोळीचा पर्दाफाश झाला.
मनीषा ठाणेकर ही खासगी बँकेतून कर्ज मंजूर करुन देण्याचे काम करते. तिच्याकडून पोलिसांनी २०० रुपयांच्या १०० नोटा जप्त केल्या. तिच्याकडे केलेल्या चौकशीत भारती गावंड हिचे नाव पुढे आले. तिच्याकडून पोलिसांनी २०० रुपये दराच्या ३०० नोटा जप्त केल्या. तिच्याच चौकशीत सचिन यमगरला पकडण्यात आले. या तिघांना कोल्हे नावाच्या व्यक्तीने या बनावट नोटा दिल्याचे सांगितले. प्रत्यक्षात कोल्हे हे नाव धारण करुन शेट्टी वावरत असल्याचे उघड झाले.
लोहगावमधील त्याच्या घरावर छापा टाकला असता घरामध्ये ४ लाख रुपयांच्या २०० रुपये दराचे बनावट नोटांचे २० बंडल, २ लाख ४ हजार रुपयांच्या खर्या नोटा, नोटा छापण्याचे प्रिंटर, ५०० रुपये दराच्या ए ४ साईजचे १हजार ११६ कागदांवर प्रत्येक कागदावर ४ नोटा या प्रमाणे एकूण २ हजार २३२ प्रिंट केलेल्या नोटा हस्तगत केल्या. त्याचे बाजारातील मुल्य २२ लाख ३२ हजार रुपये इतके आहे. त्याचबरोबर नोटा प्रिंट करण्यास वापरण्यात येणारी शाई, नोटा छापण्याचे कोरे कागद व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. नरेश शेट्टी याच्याकडे केलेल्या तपासात त्याला मदत करणार्या प्रभू गुगलजेड्डी याला तांत्रिक विश्लेषणावरुन अटक केली. त्याच्याकडून २०० रुपये दराच्या ३ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. या गुन्ह्यातील नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले लॅपटॉप मालक व इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांचा शोध घेतला जात आहे.




