
मुंबई : पहाटेच्या शपथविधीप्रसंगी आपण डबल गेमच केला होता, अशी स्पष्ट कबुलीच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पवारांचे राजकारण संपलं. आमच्यासमोर मैदानात उतरण्यासाठी कोणताच पैलवान उरलेलं नाही, अशा शब्दात खिल्ली उडवणारे आणि “पुन्हा येईन” म्हणणारे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात करेक्ट कार्यक्रम करणारे शरद पवार यांनी अखेर मौन सोडले. ०१९ मध्ये पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या आसनाखालून मुख्यमंत्री पदाची खुर्ची अलगद काढून घेतली. राजकारणात रिश्ते मे हम तुम्हारे बाप लगते है नाम है शरद पवार असेच काही चित्र राज्यातील राजकारणात 2019 पासून आज पर्यंत दिसून येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पहाटेच्या शपथविधी मागील रहस्यस्फोट केला होता. त्यात शरद पवारांनी चर्चेनंतर आम्हा दोघांना (देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधीला परवानगी दिली. त्यानंतरच सत्ता स्थापण्यासाठी आम्ही पुढे गेलो, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. या गौप्यस्फोटावर बोलताना गुरुवारी शरद पवार यांनी घूमजाव करीत, सत्तेसाठी आम्ही कोठेही जाऊ शकतो, ही त्यांची पावले समाजासमोर यावीत, म्हणून आपण डबलगेम केल्याचा खुलासा करीत पवारांनी पुन्हा एकदा कात्रजचा घाट दाखविण्याचा रंगीत प्रयोगाची कबुलीच दिली आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधी प्रकरणानंतर वर्षभराने ट्रेडिंग पॉवर’ हे प्रियम गांधी – मोदी यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यात या घटनेवर भाष्य करताना, शपथविधी आधी शरद पवार आणि अमित शहा यांच्यात गुप्त चर्चा झाली होती, असा दावा करण्यात आला आहे. शरद पवार यांचा डबल व्यवहार त्यामुळे स्पष्ट झाला आहे.
१९७८ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसचे ४० आमदार फोडून ‘पुलोद’ सरकार स्थापन केले होते, याची आठवण करून देत फडणवीस यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच सत्ता स्थापनेसाठी अजित पवारांसोबत आपण पुढे गेलो. मात्र ऐनवेळी शरद पवारांनी माघार घेत डबलगेम केल्याचा दावा केला आहे. त्यावर शरद पवार यांनी खुलासा करताना ही खेळी आपली गुगली होती आणि त्याने फडणवीस यांची विकेट गेल्याचा प्रतिदावा केला.
शरद पवार म्हणाले की, फसविले असे ते म्हणत असतील, तर ते फसले का? ते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, ते महाराष्ट्रासमोर यायला हवे, यासाठी आम्ही ते केले. माझे सासरे उत्तम गुगली बॉलर होते. मीही क्रिकेट महासंघाचा अध्यक्ष होतो. त्यामुळे गुगली कशी व कोठे टाकायची ते मला माहीत होते, त्या शपथविधीने देवेंद्र सत्तेसाठी काय करू शकतात, ते सर्वासमोर आले. त्यामुळे पवारांनी फडणवीसांची विकेट काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
