
पिंपरी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जागावाटपाबाबत भाष्य केले. यामध्ये शिंदे गटासोबत आलेले सर्व खासदार यांना त्या-त्या मतदारसंघात संधी दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचे युतीकडून तिकीट फिक्स राहणार तर शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटील यांच्या तिकिटाबाबत मात्र संभ्रम कायम राहणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्यामुळे निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करता येत नाही. अन्यथा आम्ही केव्हाही निवडणुकीसाठी सज्ज आहोत, असा दावा फडणवीस यांनी केला. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती व प्रचार यंत्रणा जोरदार सुरू आहे. मोदी@9 च्या नावाखाली देशभर भाजपकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवली जात असताना राज्यात भाजप सोबत आलेल्या शिंदे गटातील सहभागी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या तिकिटाबाबत मोठा संभ्रम होण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील सत्ता संघर्ष नंतर शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करून भाजप शिवसेनेच्या युती सरकारच्या सोबत सर्व यंत्रणा कार्यरत केली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून शिरूर लोकसभेसाठी प्रचार प्रमुखाची जबाबदारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर देऊन त्यांनाच शिरूर लोकसभेत उतरवण्याच्या हालचाली भाजपकडून सुरू आहेत तसे झाले तर शिवाजी आढळराव पाटील यांच्या डोक्यावरती तिकीट मिळण्याचे टांगती तलवार कायम राहणार आहे.
