
पुणे : कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करून पोलिस चौकीमधील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर पोलिस चौकीमध्ये राहुल कोल्हे हे पोलिस कर्मचारी रविवारी काम करीत असताना रोहन साळवे (रा. कल्याण, ता. हवेली) याने अनधिकृतरीत्या पोलिस चौकीमध्ये घुसून कोल्हे यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यामध्ये खुर्ची घालून मारहाण केली.
त्याचप्रमाणे पोलिस चौकीमध्ये असलेले संगणक व इतर साहित्य फेकून नासधूस करून सुमारे ५० हजार रुपये किमतीच्या वस्तूंची तोडफोड केली. घटनेनंतर सदर आरोपी फरार झाला असून, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय पाटील तपास करीत आहेत.
