आळंदी(वार्ताहर) – गेली 48 तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणीला गेल्या 24 तासांपासून महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच आळंदीतील चारही पूल पाण्याखाली गेल्याने आळंदीचा चारही दिशेने संपर्क तुटला.
आळंदी, दिघी पोलीस ठाणे, वाहतूक विभाग यांचेमार्फत चारही पूलांवर बॅरिगेट्स लावून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्ते बंद करण्यात आलेले आहेत, यासाठी पुराचे पाणी ओसरेपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये विनाकारण नदीकाठी येऊन सेल्फी काढू गर्दी करू नये व आपला जीव धोक्यात घालू नये असे आव्हान पोलीस प्रशासनासह इतर सर्व विभागांमार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.

यापुढील 24 तासात पाऊस असाच कोसळत राहिल्यास इंद्रायणी नदीवरील पाचव्या पुलावरून देखील पाणी जाण्याची दाट शक्यता आहे, तद्नंतर मात्र आळंदीला पर्यायी मार्ग शिल्लक राहणार नाही. यातून मार्ग काढण्यासाठी सध्या आळंदी शहरांमध्ये आळंदी पोलीस प्रशासन, आळंदी नगरपरिषद, खेड महसूल विभाग तसेच आळंदी शहर शिवसेना यांचे वतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व काही उपाययोजनांची तयारी पूर्ण झाली असून, सर्व विभाग कार्यरत आहे.
आळंदी नगरपरिषदेचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशामन दल यांचे कर्मचारी गेली दोन दिवसांपासून इंद्रायणीवर तळ ठोकून आहेत यामध्ये नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये यासाठी आळंदी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी कैलास केंद्रे यांनी कर्मचार्यांना तैनात केले आहे.




