
पुणे: पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्श कार अपघातात दोघांचा जीव गेला. अल्पवयीन मुलावर या प्रकरणात आरोप आहेत. आरोपी हा बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालचा मुलगा असल्यानं त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे आरोप होत आहेत. यावरुन राजकारणदेखील सुरु आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. त्या आरोपाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
अगरवाल कुटुंबाला वाचवायचा प्रयत्न होतोय का? अगरवाल कुटुंबानं जे वकील दिले आहेत ते शरद पवारांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे, असा दावा भाजप आमदार नितेश राणेंनी केला होता. त्या दाव्यावर महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी भाष्य केलं. चार दिवसांनंतर पोर्शे अपघात प्रकरणावर बोलणाऱ्या अजित पवारांनी शरद पवारांवर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं आणि भाजपचे आमदार नितेश राणेंना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या.
आज देशात हरीश साळवे प्रख्यात वकील आहेत. उद्या तुम्ही एखादं प्रकरण त्यांच्याकडे दिलं, तर ते लगेच तुमचे वकील होणार नाहीत. उद्या आणखी दुसऱ्या कोणाची केस असेल तर ते तिकडे जाणार. मला सगळ्यांना हात जोडून सांगायचंय की असं कोण कुठला वकील कोणाला देत नाही. हे सगळं बकवास आहे. असे आरोप करुन आपण या प्रकरणाची दिशा दुसरीकडेच घेऊन जात आहोत. जो वकील दिलाय त्यालाच विचारा की तुला कोणी नेमलं? तुला कोणी केस लढवण्यास दिली? हे त्या वकिलालाच विचारा,’ अशा शब्दांत अजित पवारांनी नितेश राणेंना अप्रत्यक्षपणे टोला हाणला.
