
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी विधाने केल्याचा आरोप करीत त्यांची पक्षातून हकालपट्टीची मागणी सुरू असताना माजी खासदार आनंदराव अडसूळ त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. कीर्तिकर यांच्यावर आम्ही कारवाई होऊ देणार नाही, असे नमूद करतानाच अडसूळ यांनी दरेकर यांना विनाकारण न बोलण्याचा सल्ला दिला.
गजानन कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदे यांनी केली आहे. त्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनीही कीर्तिकर यांना लक्ष्य केले. अमोल कीर्तिकर यांना निवडून आणण्यासाठी गजानन कीर्तिकर यांनी कट रचल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. या पार्श्वभूमीवर अडसूळ यांनी शिशिर शिंदे यांना लक्ष्य केले.
