कर्णधार रोहित शर्माने आणि शुबमन गिलने भारताला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली होती. पण एबॉटने रोहितला तर झॅम्पाने शुबमन गिलला बाद केल्यानंतर भारताचे सलामीवीर फलंदाज तंबूत परतले. मात्र, विराट कोहलीने कांगांरुंचा समाचार घेत अप्रतिम खेळी केली. ७२ चेंडूत ५४ धावा करून विराटने भारताला विजयाच्या दिशेनं नेलं होतं. राहुलनेही विराटसोबत सावध खेळी केली. पण दोघेही बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही तिसऱ्यांदा शून्यावर बाद होऊन गोल्डन डक झाला. एगरने सूर्यकुमारला तंबूत पाठवल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर हार्दिकने भारताची कमान सांभाळत ४० चेंडूत ४० धावा केल्या. मात्र, झॅम्पाने हार्दिकला आणि रविंद्रे जडेजाला बाद करून ऑस्ट्रेलियाचा विजय जवळपास निश्चित केला होता.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने १७ चेंडूत ३० धावा केल्या. तर सलामीवीर फलंदाज शुबमनने ४९ चेंडूत ३७ धावांची खेळी साकारली. पण हे दोघेही सलामीवीर फलंदाज तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने चौफेर फटकेबाजी करत महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. विराटसोबत के एल राहुलनेही धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. के एल राहुलने ५० चेंडूत ३२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियच्या एबॉटने रोहितला बाद केलं. तर अॅडम झॅम्पाच्या गोलंदाजीवर शुबमन गिल आणि के एल राहुल बाद झाला. विराट अर्धशतकी खेळी करून चांगल्या लयमध्ये खेळत होता.
पण विराटला एगरने ५४ धावांवर असताना झेलबाद केलं.त्यानंतर अक्षर पटेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण त्यालाही धावांचा सूर गवसला नाही आणि तो अवघ्या २ धावांवर रनआऊट झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला सूर्यकुमार पुन्हा एकदा शून्यावर बाद होऊन गोल्डन डक झाला. ७ नंबरवर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमारला एगरने क्लीन बोल्ड केलं.