पिंपरी : विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नदी सुधार प्रकल्पाचे काम तत्काळ थांबविण्याच्या सूचना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील नद्यांवर नदीसुधार प्रकल्प राबवला जात आहे. त्याची सुरुवात मुळा नदीतून पिंपळे निलख येथून करण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी शहरातील नागरिक, पर्यावरणप्रेमी व सामाजिक संस्थांनी विरोध दर्शवला असून, सातत्याने आंदोलने केली जात आहेत. रविवारी (२७ एप्रिल) पुन्हा नदी सुधार प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्यात आले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी मुळा नदीकाठी आंदोलकांची भेट घेतली. नदी सुधारच्या नावाखाली तसेच शहरात होत असलेल्या बेकायदा वृक्षतोडीबाबत पर्यावरणप्रेमींनी बनसोडे यांना माहिती दिली. त्यावर बनसोडे यांनी नदीसुधार प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवण्याच्या सूचना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.
पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामठे उद्यान ते पिंपळे निलख स्मशानभूमी जवळील नदी पात्रापर्यंत नागरिक व पर्यावरणप्रेमींनी पदयात्रा काढली. या पदयात्रेत सुमारे तीन हजार नागरिकांनी सहभाग घेतला. सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या आंदोलनाशी जोडले जात आहेत. नदीकाठी गेल्यानंतर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नदी सुधार योजनेअंतर्गत झालेल्या वृक्षतोडीमुळे गतप्राण झालेली झाडे, अधिवास नष्ट झाल्यामुळे प्राण गमावलेल्या पशु-पक्ष्यांना देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी नदी संरक्षणाची प्रतिज्ञा घेतली. नदी बचाव विषयावर लघुनाटिका सादर करण्यात आली.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. पर्यावरण प्रेमींशी चर्चा करून नदी पात्राची बनसोडे यांनी पाहणी केली. नदी सुधार योजनेच्या नावाखाली होत असलेली बेकायदा वृक्षतोड चुकीची आहे. नदीकाठी भराव टाकल्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. त्यामुळे नदीसुधार प्रकल्पाचे काम तत्काळ थांबवण्याच्या सूचना बनसोडे यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना केली आहे. या कामाची चौकशी करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यानंतर नदी सुधार प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन बनसोडे यांनी दिले.
शहरात सातत्याने बेकायदेशीरपणे वृक्षतोड होत असून अनेक प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे देखील दाखल झाल्याचे बनसोडे यांना सांगण्यात आले. त्याबाबत बोलताना बनसोडे म्हणाले, अवैधपणे वृक्षतोड करून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील.