मुंबई : राज्यात शिंदे फडणवीस सरकारला 30 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात सरकारने मागील एक वर्षात अनेक निर्णय घेतले असल्याने शासन आपल्या दारीच्या माध्यमातून राज्यभर डंका पीतताना दिसत आहे. पण सत्तेतील मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, महाराष्ट्र भूषण समारंभात झालेली दुर्घटना, शिदे यांच्या सोबत आलेल्या आमदारांची नाराजी, घटक पक्ष घेत असलेले तोंडसुख व विरोधकाकडून वारंवार होत असलेले खोके सरकारचा आरोप यामुळे शिंदे फडणवीस सरकारला कामगार दमदार दाखवताना वादाची ही किनार असल्याचे दिसून येत आहे.
सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी भाजप सोबत जाऊन राज्यात सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांच्या या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. लोकाभिमुख निर्णयाद्वारे त्यांची सोशल मीडियात जोरदार चर्चा दिसून येते. काही दिवसापूर्वी “देशात मोदी आणि राज्यात शिंदे” अशा जाहिरातीच्या माध्यमातून शिंदे व फडणवीस यांच्यात मिठाचा खडा पडला असे बोलले जात आहे. मात्र या दोघांनीही त्यावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यात स्थापन झालेले सरकार व त्यामधील मुख्यमंत्र्यांसोबत सोळा आमदारांच्या अपात्र ठरविण्याची निर्णय प्रक्रिया अनेक महिने सुप्रीम कोर्टात सुरू होती. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीने पायउतार केले त्यानंतर राज्यातील तमाम शिवसैनिकांच्या मनात झालेले दूषित वातावरण आणि विरोधकाकडून पन्नास खोके एकदम ओके यांना वारंवार होणारा प्रचार यामुळे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारकडून होणाऱ्या कामाकडे दुर्लक्ष होऊन त्यांची नकारात्मक चर्चा सर्वाधिक होताना दिसत आहे.



