
पिंपरी : तुम्हाला ‘स्पेशल मोबाईल नंबर’ मिळण्याची संधी असल्याचा मेसेज आला असेल, तर सावध व्हा! सायबर गुन्हेगार सोशल मीडियावर मोबाईलसाठी आकर्षक क्रमांक विक्रीच्या जाहिराती देऊन नागरिकांना गंडवत आहेत. व्यवहाराची खात्री देणारे हे फसवे लोक पैसे मिळाल्यावर गायब होतात. पुणे, मुंबई, नागपूरसह अनेक शहरांमध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी- चिंचवड सायबर विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
तरुणाला 20 हजारांचा फटका
शहरातील एका तरुणाला सोशल मीडियावरून गोल्डन क्रमांक खरेदीची ऑफर मिळाली. 20 हजारात मोबाईलचा आकर्षक क्रमांक मिळू शकतो, असे सांगण्यात आले. सुरुवातीला एजंटने विश्वास मिळवण्यासाठी सीम कार्ड कुरिअरने पाठवले आणि सीम कार्ड अॅक्टिव्हेट झाल्यावर पैसे द्या, असे सांगितले. सीम कार्ड कुरिअरने मिळाल्याने तरुणाने पैसे ऑनलाईन ट्रान्सफर केले. मात्र, सीम कार्ड अॅक्टिव्हेट झाले नाही, म्हणून संबंधित एजंटला फोन केला; मात्र त्याचा मोबाईल बंद झाला. तरुणाने मोबाईल कंपनीशी संपर्क साधला असता, अशा क्रमांकाची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे समजले. अखेर फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
अशी आहे फसवणुकीची पद्धत
सायबर गुन्हेगार सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सवर गोल्डन मोबाईल नंबर स्वस्तात मिळत असल्याच्या जाहिराती देतात. ग्राहकाने संपर्क साधताच, त्याला नंबर निवडण्यास सांगितले जाते आणि व्यवहार सुरक्षित असल्याची हमी दिली जाते. विश्वास जिंकण्यासाठी हे ऑनलाईन एजंट सीम कार्ड आधी मिळेल आणि अॅक्टिव्हेट झाल्यावरच पैसे द्या, असे सांगतात. ग्राहकाचा अधिक विश्वास मिळावा म्हणून कुरिअरद्वारे सीम कार्ड पाठवले जाते; मात्र सीम अॅक्टिव्हेट करण्यापूर्वी पैसे घेतले जातात आणि पैसे मिळताच एजंट मोबाईल बंद करून गायब होतो. सीम अॅक्टिव्हेट होत नाही आणि ग्राहक फसवणुकीचा बळी ठरतो.
गोल्डन नंबर म्हणजे काय?
गोल्डन मोबाईल क्रमांक म्हणजे विशेष पॅटर्न असलेले, लक्षात ठेवायला सोपे आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे नंबर. यामध्ये काही वाढदिवसाच्या तारखा देखील असतात. उदा. 7777777777, 9999999999, 1234567890, 25121990 (विशेष तारखा किंवा क्रमवारी असलेले नंबर).
गोल्डन नंबर अधिकृतपणे कसा घ्यावा?
गोल्डन नंबर Jio, Airtel, Vi, BSNL सारख्या अधिकृत नेटवर्क कंपन्यांच्या वेबसाइट किंवा स्टोअरमधून खरेदी करावा. काही वेळा हे नंबर लिलावाद्वारे विकले जातात. त्यामुळे, अधिकृत स्रोतांकडून खात्री करणे गरजेचे आहे.
सायबर गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. गोल्डन मोबाईल क्रमांक मिळवण्याच्या मोहात पडू नका. अधिकृत मोबाईल सेवा कंपन्यांकडूनच नंबर घ्या. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ऑनलाईन पैसे पाठवू नका. जर कोणी फसवणुकीचा बळी ठरला असेल, तर सायबर पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधावा.
रविकिरण नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस
फसवणूक टाळण्यासाठी काय करावे?
- सोशल मीडियावरील अनोळखी जाहिरातींवर विश्वास ठेवू नका.
- पेमेंट करण्यापूर्वी एजंटच्या विश्वासार्हतेची योग्य शहानिशा करा.
- फसवणुकीचा संशय आल्यास सायबर पोलिस ठाण्यात त्वरित तक्रार करा.
- कोणत्याही एजंटकडून कुरिअरने सिम कार्ड मागवण्याच्या आमिषाला बळी पडू नका.
- मोबाईल क्रमांक खरेदी करताना अधिकृत दस्तऐवज मिळतो का, याची खात्री करा.
- फक्त अधिकृत नेटवर्क कंपन्यांकडूनच नंबर खरेदी करा.
