
चाकण : प्रदूषण करणार्या भंगार व्यावसायिकांना जागा देऊ नये, तसेच अशा व्यवसायांना परवानगी न देण्याचा निर्णय कुरुळी ग्रामपंचायतीने घेतला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली-कुदळवाडी येथे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करत भंगार गोदामांसह हजारो लघुउद्योग आणि व्यावसायिकांवरही बुलडोझर फिरवला आहे.
परिणामी, त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, त्यांना आता पुन्हा व्यवसाय उभारणीसाठी नवीन जागेसाठी धावाधाव करावी लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने कुदळवाडी येथे केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत सुमारे 2 हजार 845 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहेत. या कारवाईमुळे हजारो उद्योग व व्यवसाय उघड्यावर आले असून, मशिनरी व मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. संबंधित उद्योजक व भंगार व्यावसायिक आता चाकण एमआयडीसी व लगतच्या गावांमध्ये व्यवसायासाठी जागेचा शोध घेत आहेत. त्यासाठी जादा भाडे देण्याची तयारीही दाखवीत आहेत.
या भंगार व्यावसायिकांना किंवा इतरांना जागा भाड्याने दिल्यास कुदळवाडीसारखा बकालपणा गावात निर्माण होईल का, अशी भीती महाळुंगे, कुरुळी, मोई, चिंबळी, निघोजे येथील ग्रामस्थांना वाटत आहे. त्यासाठी जागा भाड्याने देताना व्यवसायाच्या प्रकाराची माहिती घेत व्हेरिफिकेशन करावे. प्रदूषण होणारा व्यवसाय तसेच भंगार दुकानांना जागा देऊ नये. तसेच, वाहतुकीला अडथळा करू नये आदी नियम व्यावसायिकांना लावले जात आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरापासून शेजारी असलेल्या चाकण, महाळुंगे, कुरुळी, मोई, चिंबळी, निघोजे तसेच औद्योगिक परिसरात जागेचा शोध त्यांच्याकडून घेतला जात आहे. मात्र, जागेला अचानक मागणी आल्याने जागा विक्रीची किंमत आणि भाड्यात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
तसेच, महापालिका हद्दीलगतच्या गावांतील ग्रामपंचायतींनी हद्दीतील जागा मालकांना भंगार व्यावसायिकांना मोकळी जागा व गोदामे भाड्याने देऊ नये, असे पत्र काढले आहे. जागा भाड्याने दिल्यास त्यांना कुठल्याही प्रकारच्या परवानग्या मिळणार नाहीत, असेही या पत्रात म्हटले आहे.
कुरुळी हद्दीत भंगार दुकानांना जागा भाड्याने किंवा विकत देऊ नये. या भंगार दुकानांमुळे परिसरात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा त्रासदायक व्यवसायास ग्रामपंचायतीकडून कुठलीही परवानगी दिली जाणार नाही.
– अनिता राजेंद्र बधाले, सरपंच, कुरुळी
