पिंपरी – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील त्रुटी, गोंधळ आणि अनियमितता तातडीने दूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. शहराध्यक्ष व माजी महापौर योगेश मंगलसेन बहल यांनी निवेदनाद्वारे ही गंभीर बाब मांडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, मंगला कदम, पंकज भालेकर, उल्हास शेट्टी, विकास साने, विनायक रणसुभे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ – आदेशांचे उल्लंघन
16 जुलै 2025 रोजी आयोगाने दिलेल्या स्पष्ट निर्देशांनंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात त्रुटी झाल्याचे बहल यांनी नमूद केले आहे.
-
प्रभागाच्या हद्दीतील मतदारांना योग्य प्रभागात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक स्थळ पाहणी न करता संपूर्ण वस्त्या चुकीच्या प्रभागात टाकण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
-
अनेक प्रभागांत तब्बल पाच हजारांपेक्षा जास्त मतदारांची चुकीची नोंद आढळली आहे.
-
सेक्शन अॅड्रेसच्या चुकीमुळे वस्त्या व परिसरांची नावे थेट चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याने मोठ्या प्रमाणात मतदारांना आपले नाव शोधणे कठीण झाले आहे.
मतदारांना नाव शोधण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही
मनपाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या PDF याद्यांमध्ये शोध (Search) सुविधा नसल्याने मतदारांना नाव शोधण्यासाठी मॅन्युअल पद्धतीने त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच याद्यांमध्ये मतदारांचे फोटो नसल्याने एकाच नावाचे अनेक मतदार ओळखणे अधिक कठीण होत आहे.
दुबार व तिबार मतदारांची लाखोमध्ये नोंद
प्रारूप मतदारयाद्यांमध्ये तब्बल एक लाखांहून अधिक दुबार/तिबार नोंदी असल्याचे बहल यांनी नमूद केले.
आयोगाने मनपाकडे दिलेली सुमारे 92 हजार दुबार नावांची यादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सादर केलेली 12 हजार नावे असूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी – तातडीने उपाययोजना कराव्यात
गंभीर त्रुटी लक्षात घेऊन बहल यांनी आयोगाकडे पुढील उपाययोजना तातडीने राबवाव्यात असे आवाहन केले आहे:
-
मतदारांना नाव, पत्ता किंवा EPIC क्रमांकावरून ऑनलाईन / ॲपद्वारे नाव शोधता येईल अशी सुविधा उपलब्ध करावी.
-
वेबसाईटवरील PDF याद्यांमध्ये ‘Search’ सुविधा त्वरित समाविष्ट करावी.
-
चुकीच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आलेल्या वस्त्यांची स्थळ पाहणी करून suo-moto दुरुस्ती करावी.
-
प्रभागनिहाय विशेष हेल्प सेंटर्स सुरू करावेत.
-
सेक्शन अॅड्रेसऐवजी प्रत्यक्ष भौगोलिक हद्द तपासून दुरुस्ती करावी.
-
प्रारूप मतदारयादीवरील हरकती दाखल करण्याची मुदत वाढवावी.
-
हरकती दाखल करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करावी.
-
दुबार मतदारांविरुद्ध तातडीने कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा.
-
मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी निदर्शनास आणलेल्या त्रुटींची चौकशी करून दुरुस्ती करण्याची मुभा मनपा आयुक्तांना द्यावी.
राष्ट्रवादी काँग्रेसने या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि नागरिकहिताची रहावी यासाठी उच्चस्तरीय पातळीवर त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे.




