तळवडे : तळवडे प्रभागात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीने प्रचंड गोंधळ उडवत संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात धक्का बसवला आहे. एकाच प्रभागातील मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकणे, काहींची नावे गायब होणे, संपूर्ण याद्या चुकीच्या प्रभागात जोडणे — हे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. तळवडेकर ग्रामस्थांचाही याच गोंधळात मोठ्या प्रमाणावर फटका बसला आणि त्यानंतर ग्रामस्थांनी विद्यमान नगरसेवक पंकज भालेकर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरत तीव्र निदर्शने केली.
शांताराम भालेकरांचा “सहानुभूती” आरोप उलटणाराच
या निदर्शनानंतर माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. मात्र त्यांच्या या वक्तव्याने त्यांच्याच विरोधात अस्वस्थतेची झळ अधिक प्रकर्षाने जाणवली. तळवडेकरांच्या मते मतदार यादीत “नाव प्रभागातून बाहेर गेल्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करणं स्वाभाविक आहे ते राजकारण नसून मदतदार हक्कासाठी लढा देणे हे वास्तव आहे.
शांताराम भालेकरांनी केलेल्या टीकेतून त्यांचा राजकीय शहाणपणा किती बोचरा व दूरदृष्टीहीन आहे, हेच अधिक स्पष्ट झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे. प्रभाग १२ चा धक्कादायक घोळ आणि अंदाजे 1,200 पेक्षा अधिक मतदारांचे स्थलांतर झाले आहे. प्रभाग १२ मधील यादीभाग क्रमांक ७ हा निवडणूक आयोगाच्या “तांत्रिक चुकीमुळे” थेट प्रभाग १ ला जोडला गेला. या चुकीमुळे सुमारे 1,261 मतदारांचे मतदान हक्क दुसऱ्या प्रभागात ढकलले गेले. स्वतः पंकज भालेकर यांचे नावही चुकीच्या प्रभागात दिसले. या धक्कादायक प्रकारामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत आंदोलन छेडले. ग्रामस्थांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत पंकज भालेकर स्वतः रस्त्यावर उतरले आणि त्यामुळे जनआक्रोश अधिक तीव्र झाला.
हे फेक नेरेटिव्ह नव्हे.. लोकशाही हक्कांचा प्रश्न..
या आंदोलनात कोणत्याही पक्षाला टार्गेट करण्याचा हेतू नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. परंतु “ज्यांच्या पोटात काही नाही, त्यांच्याच पोटात गोळा आला”, अशा शब्दांत ग्रामस्थांनी शांताराम भालेकरांच्या आरोपाचे खंडन केले. मतदारांच्या हक्कासाठी उभे राहणे हे राजकारण नाही; ते नागरिकत्वाचे रक्षण करणे हे प्रथम कर्तव्य आहे.
मतदार यादीतील घोळ, सर्व पक्ष एकमताने संतापले
मतदार यादीतील चुका हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा मुद्दा नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ते भाजपचे आमदार अमित गोरेखे यांनीही निवडणूक आयोगावर उघड टीका केली आहे. महाविकास आघाडीने पालिकेच्या प्रवेशद्वारात मतदार यादीची होळी करून तीव्र निषेध केला. यात राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच पक्ष विरोध करत नाही हेच दिसून येते. यातून एकच संदेश स्पष्ट जातो की मतदार यादीत प्रचंड तफावत आहे आणि निवडणूक आयोगाने गंभीर दुरुस्ती करावी.
2017 पासूनची भाजपची अंतर्गत अस्वस्थता
2017 मध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांकडून नवख्या कार्यकर्त्यांनी त्यावेळचे राजकीय नेत्यांना “घरचा रस्ता” दाखवला अगदी भोसरीच्या पैलवानाला मात दिली, त्यानंतरची अस्वस्थता गेली आठ वर्षे “शांत” राम..राम करत बसली होती. पण नुकत्याच प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार याद्यातील घोळाच्या मुद्द्यावरून ती सोशल मीडियावरून का होईना बाहेर पडताना दिसत आहे.
तळवडेकर जनता सुज्ञ — सत्याला मान देणारी
तळवडेचे ग्रामस्थ मतदार यादीतील घोळाबद्दल एकच भावना व्यक्त करताना दिसतात. जे खरं आहे ते खरं, जे खोटं आहे ते खोटंच. आम्ही आमच्या मतदान हक्कासाठी उभे आहोत. शांत..रावांना बरं वाटावं म्हणून आंदोलन करत नाही. त्यामुळे राजकारणासाठी हतबल झालेली अशी केविलवाणी धडपड त्यांनी करावी लागते म्हणजे रणांगणात येण्यापूर्वीच हत्यार टाकले, असा ट्रेंड सोशल मीडियामध्ये व्हायरल होताना दिसत आहे.



