
तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी वातावरण चांगलंच तापलं होत. नगरपालिकेच्या इमारतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्का-बुक्की झाल्याने गोंधळ उडाला होता. तळेगांव पोलीसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण निवळले, शहरातील दोन ते तीन ठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यां मध्ये धक्काबुक्की झाल्याने महायुती मधील हा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती आहे. युतीमधून ही निवडणूक लढवली जात आहे. नेत्यांनी युती केली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये मात्र धुसफूस दिसून येत आहे. तळेगांव मध्ये १९ नगरसेवक बिनविरोध झाले असून, राष्ट्रवादी १० तर भाजपचे ९ उमेदवार असे एकूण १९ बिनविरोध झाले आहेत.
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निर्माण झालेल्या या गोंधळामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीत आणखी भर पडली आहे. महायुतीत असूनही उमेदवारी वाटप, प्रभाग रचना आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी यामुळे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. घडलेली धक्का-बुक्की ही केवळ एक किरकोळ घटना नसून, निवडणुकीच्या तणावपूर्ण वातावरणात युतीतील विसंवाद वाढल्याचे द्योतक मानले जात आहे.
दरम्यान, तळेगावमध्ये १९ नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याची स्थिती निर्माण झाली असली तरी उर्वरित जागांवर दोन्ही पक्षांतील तणाव कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील काही भागांत कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याची माहिती मिळते. पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र निवडणुकीच्या पुढील टप्प्यात महायुतीचा हा अंतर्गत संघर्ष किती वाढतो किंवा निवळतो, याकडे स्थानिकांच्या नजरा लागल्या आहेत.



