पिंपरी-चिंचवड : राजकारणात देवदेवतांचे नाव घेऊन सत्ता मिळवण्याचा ट्रेंड महाराष्ट्रात नवीन नाही. पण “काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल” या संवादानंतर उभ्या राहिलेल्या राजकीय स्फोटाने शिवसेनेतील उलथापालथ, सुरत मार्गे गोहाटी प्रवास आणि तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणाला जे वारे दिले… त्याच वाऱ्यांचा प्रभाव आता पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपर्यंत पोहोचला आहे.
नऊ वर्षांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत इच्छुकांचे दर्शनाचे राजकारण उच्चांक गाठताना दिसत आहे. शहरातील अनेक भावी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, खासदार–आमदारांचे नातेवाईक आणि प्रमुख कार्यकर्ते एकामागून एक कामाख्या देवीच्या चरणी साकडे घालण्यासाठी गोहाटीकडे धाव घेत आहेत. तिकडे दर्शन घेतलं की सत्ता मिळते, असा एक अघोषित “राजकीय शॉर्टकट” अवलंबिल्याचा सूर सध्या ऐकू येत आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये उमेदवारीचा तगडा खेळ सुरू असताना अनेक जण जनतेचा आशिर्वाद मिळवण्यापेक्षा देवीच्या कृपेवर अधिक विसंबून विजयाची खात्री करून घेत असल्याचे चित्र आहे. जनसेवा, विकास, कामगिरीचा मुद्दा बाजूला पडून “दर्शन घेतलं की तिकीट पक्कं, विजय ठक्क!” असा ट्रेंड राजकारणात झपाट्याने वाढताना दिसत आहे.
आता प्रश्न असा भावी नगरसेवक जनतेसाठी मैदानात उतरणार की देवांच्या भरवशावर सत्ता मिळवण्याचा शॉर्टकट निवडणार? महापालिकेच्या रणधुमाळीपूर्वी या ‘दर्शन पॉलिटिक्स’मुळे शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे.




