वडगाव मावळ : तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीत युतीतील अंतर्गत बंडखोरी अखेर आटोक्यात आणण्याचे अर्धे-अधुरे यश मिळाले. 28 पैकी तब्बल 19 जागा बिनविरोध झाल्याने युतीने मोठा श्वास टाकला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 तर भाजपचे आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आले. प्रभाग 1, 4, 6, 9, 11, 12, 13 आणि 14 मधून एकूण 16 उमेदवार निर्विरोध तर प्रभाग 2, 5 आणि 7 मधून आणखी तीन उमेदवार बिनविरोध विजयी ठरले. त्यामुळे या 8 प्रभागांमध्ये मतदानच होणार नाही.
मात्र युतीच्या विजयानंतरही सर्वांच्या नजरा खिळून राहिलेला प्रभाग क्रमांक 8 अखेर बिनविरोध झाला नाही आणि राजकीय धुरळा कायम राहिला. कारण या प्रभागात आमदार सुनील शेळके यांच्या बंधू सुदाम शेळके यांचा थेट सामना भाजपचे विद्यमान नगरसेवक अमोल शेटे यांच्यासोबत होणार आहे.
यामुळे तळेगावमध्ये रंगणारी लढत आता प्रतिष्ठेची झाली असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या चर्चेचा केंद्रबिंदू प्रभाग 8 ठरला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशीही दोन्ही गटांमधील वाटाघाटी फसल्याने शेवटी आमदार सुनील शेळके यांनाच पुढे येत भावाच्या प्रचाराचा नारळ फोडावा लागला.
या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीचा सूर अधिकच तापला असून तळेगावच्या राजकारणात पुढील काही दिवस शेलगेंची प्रतिष्ठा व भाजपची पकड यामधील थेट संघर्ष दिसणार आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू झाली असून प्रभाग 8 मधील निवडणूक संपूर्ण परिषदेसाठी ‘दिशादर्शक’ राहील, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.
तळेगाव निवडणुकीत ‘महायुतीचा धर्म’ कोण पळणार
“तळेगावमध्ये निवडणुका बिनविरोध करण्याचा आमचा महायुतीचा मानस होता. त्या दृष्टीने मी मनापासून प्रयत्न केला. भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या बंधूंनाही बिनविरोध करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला. मात्र त्याच भाजपकडून माझ्या भावाच्या विरोधात उमेदवार दिला. म्हणजे एकीकडे माझ्यासाठी बिनविरोधाची अपेक्षा आणि दुसरीकडे माझ्याच कुटुंबाविरुद्ध उमेदवारी हा कोणता डाव खेळला माहीत नाही. याबाबत नाराजी असूनही नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवाराला दिलेला पाठिंबा कायम ठेवणार असून, महायुतीचा धर्म स्वतःच पाळणार असल्याचा निर्धारही आमदार सुनिल शेळके यांनी बोलताना व्यक्त केला.



