पिंपरी :- वेश्या व्यवसाय चालणारा आळंदी फाट्याजवळील सप्तगिरी लॉज येथे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून ५ पिडित महिलांची सुटका केली. लॉजमालक गजानन सटवाजी आव्हाड (वय २८, रा. आळंदी, ता. खेड, मुळ रा. दहिठना, ता. जि. परभणी) याच्याविरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हॉटेल व मसाज पार्लर, स्पा च्या ठिकाणी चालणार्या अवैध वेश्या व्यवसायाविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वेळोवेळी दिले आहे. त्याअनुषंगाने पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार व सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या अधिपत्याखाली सहायक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
मागील आठवड्यात हिंजवडी परिसरातील सनराईज वेलनेस आयुर्वेदिक स्पा येथे छापा टाकून वेश्या गमनासाठी वापर करण्यात येणारी १ महिला तसेच रावेत परिसरातील निसर्गम आयुर्वेदिक स्पा येथे छापा टाकून २ महिलांची सुटका करण्यात आली होती. संबंधित स्पाचालक, मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या वर्षभरात अवेध वेश्या व्यवसाय करणाऱ्या एकूण २६ ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यात एकूण ६ मसाज पार्लर/स्पा, ७ हॉटेल, ३ रहिवाशी फ्लॅट अशा ठिकाणी व १० ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणारा वेश्या व्यवसायाचा समावेश आहे. या २६ गुन्ह्यात एकूण ४२ आरोपींना अटक करण्यात आली असून ५५ पिडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ४ ठिकाणे सील..
गेल्या महिन्याभरात सार्वजनिक ठिकाणाच्या परिसरात मसाज पार्लर/स्पा व रहिवाशी ठिकाणाचे आडून अवैधरित्या वेश्या व्यवसाय करणार्या एकूण ४ ठिकाणे १ वर्षासाठी बंद करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिला आहे. त्यात रुपेन स्पा (वाकड) व रहिवासी फ्लॅट, दे वेदा स्पा (हिंजवडी), न्यू ओम स्पा (सांगवी) यांचा समावेश आहे. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणांच्या परिसरात वेश्या व्यवसाय करणार्या इतर ठिकाणांची देखील प्राथमिक चौकशी चालू असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.



