
नवी दिल्ली : लोकसभेत भाजपाला बहुमताचा आकडा न गाठता आल्याने दोन पक्षांच्या आधारावर सरकार स्थापन करावे लागले आहे. यामुळे आता लोकसभेत भाजपाला या दोन पक्षांची मनधरणी सातत्याने करावी लागणार आहे. तर तिकडे राज्यसभेतील संख्याबळ देखील कमी असल्याने तिथे आकड्यांची जुळवा-जुळव करणे राजकीयदृष्ट्या अवघड काम असणार आहे. येथे आवश्यक संख्याबळ साधण्यासाठी भाजपाला आणखी काही पक्षांची मनधरणी करावी लागेल. एकुणच राज्यसभेचा मार्ग सुद्धा भाजपसाठी सोपा नाही.
भाजपाचे राज्यसभेचे स्वत:चे ९० सदस्य असेल तरी महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी सभागृहात दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा मिळणे गरजेचे असते. त्यामुळे येथे भाजपाला आणखी खासदारांची जुळवा-जुळव करावी लागेल, आणि ही जुळवा-जुळव वाटते तेवढी सोपी देखील नाही. कारण, भाजपाने मागील दहा वर्षात अनेकांना दुखावलेले आहे, हे लोक किती मदत करतील हा प्रश्नच आहे.
राज्यसभेच्या २४५ सदस्यांच्या सभागृहात सध्या १५ पदे रिक्त आहेत. १० निवडून आलेले सदस्य आणि ५ नामनिर्देशित सदस्यांचा यात समावेश आहे. यामध्ये ५ नामनिर्देशित खासदारांचा समावेश केला तरी भाजप बहुमताच्या आकड्यापासून थोडा दूरच राहणार आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी भाजपाला जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरची मदत घ्यावी लागेल. वायएसआरचे राज्यसभेत ११ खासदार आहेत. तर, नवीन पटनायक यांच्या बीजेडीचे ९ खासदार आहेत.
परंतु, लोकसभा निवडणुकीत भाजपा नेत्यांनी वायएसआर आणि बीजेडीच्या नेत्यांवर केलेल्या कठोर टीकेमुळे त्यांचा पाठिंबा मिळविणे अवघड आहे. हे पक्ष काँग्रेससोबत जाण्याची शक्यता नसली तरी भाजपला आव्हान देण्यासाठी ते इंडिया आघाडीला मदत करू शकतात. असे झाले तर भाजपाचे काम अवघड होईल.
