राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सातवीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्लीतील तत्कालीन राजवटीचे सर्व संदर्भ वगळण्यात आले आहे. भारतीय राजवंशांवरील प्रकरण; त्याचबरोबर ‘महाकुंभमेळ्या’चे संदर्भ आणि ‘मेक इन इंडिया’सह ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश केला गेला आहे.
या आठवड्यामध्ये प्रसिद्ध झालेली नवीन पाठ्यपुस्तके नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) आणि ‘नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर स्कूल एज्युकेशन २०२३’च्या अनुषंगाने तयार केली आहे. त्यानुसार शालेय शिक्षणात भारतीय परंपरा, तत्त्वज्ञान, ज्ञानप्रणाली आणि स्थानिक संदर्भसमाविष्ट करण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, ‘हा पुस्तकाचा केवळ पहिला भाग असून, दुसरा भाग येत्या काही महिन्यांत येणे अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीईआरटीने यापूर्वी ‘मुघल’ आणि ‘दिल्ली सल्तनत’ यावरील विभाग कमी केले होते. २०२२- २३ मध्ये कोरोनामध्ये तुघलक, खिलजी, मामलुक आणि लोदी यांसारख्या राजवंशांचे तपशीलवार वर्णन आणि मुघल सम्राटांच्या कामगिरीवरील दोन पानांचा तक्ता वगळला होता, पण नवीन पाठ्यपुस्तकाने हे सर्वच संदर्भ काढून टाकण्यात आले आहेत.