नागपूर: नागपूरसह देशभरात सोन्याचे दर स्थिर होण्याचे चिन्ह दिसत नाही. मध्यंतरी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रती दहा ग्राम ७५ हजारापर्यंत गेले होते. परंतु आता हे दर ७२ हजारांच्या जवळपास जात आहे. दरम्यान गुरूवारी (२० जून) नागपुरात सराफा बाजारात सोन्याचे दर तीन वेळा बदलले. वारंवार सोन्याच्या दरात बदल होत असल्याने ग्राहकांच्या मनात सोनं खरेदीबाबत गोंधळ दिसत आहे.

 

नागपूरसह राज्यातील बहुतांश भागात विवाह सोहळे, वाढदिवस, लहान मुलाचे बारसेसह इतरही कार्यक्रमांमध्ये अनेक कटुंबात सोन्याचे दागिने भेट दिले जातात. त्यामुळे आताही या कार्यक्रमासाठी नागरिकांकडून कमी- अधिक प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहे. त्यामुळे आताही नागपुरातील सराफा व्यावसायिकांकडे गर्दी आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात २० जूनला सकाळी १०.३० वाजता २४ कॅरेट सोन्याचे दर प्रती दहा ग्रॅमसाठी ७२ हजार ३००, २२ कॅरेटसाठी ६७ हजार २००, १८ कॅरेटसाठी ५६ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४७ हजार रुपये होते. तर चांदीचा दर प्रती किलो ९० हजार ६०० रुपये होता.