पिंपरी : पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने दोघांना अटक केले असून त्यांच्याकडून 50 हजारांचे एक बेकायदा पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई मगळवारी (दि.18) हिंजवडी येथे करण्यात आली.
गणेश उर्फ गणी कालीचरण तिवारी (वय-19 मुळ रा. चोपडा, जि. जळगाव सध्या रा. धानोरी, विश्रांतवाडी), ज्ञानेश्वर किसन चव्हाण (वय-25 मुळ रा. वरुड, पोस्ट मोहा ता. पुसद जि. यवतमाळ सध्या रा. मारुंजी, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार गंगाराम चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पेट्रोलींग करत होते. त्यावेळी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विप्रो कंपनी समोर पाटील अमृततुल्य या चहाच्या दुकानासमोरून आरोपी दुचाकीवरुन संशयास्पद जाताना दिसले. पथकाने दोघांना अडवून त्यांची अंगझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे एक लोखंडी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी पिस्टल, काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.