जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग हादरलंय. 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर भारताने कारवाई करत सिंधू नदी करार रद्द केला आणि पाकिस्तान विरोधात अनेक कठोर पावले उचलायला सुरुवात केलीय. त्यामुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली असून काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली जात आहे.
या कारवाईत आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली असून अनेक संशयित सुरक्षा दलाच्या रडारवर आसल्याची माहिती आहे. एकीकडे भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली असताना दहशतवाद्यांची पायाखालची वाळू सरकली असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशातच या लष्कराच्या कारवाईचा धसका आता काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेले दहशतवादी संघटना काश्मीर रेझिस्टन्स फ्रंटने (Kashmir Resistance Front) घेतला आहे. परिणामी या संघटनेकडून धमकीचा ऑडिओ संदेश जारी करत भारताला इशारा देण्यात आला आहे.
दहशतवाद्यांची घरं पाडल्यानंतर KRF संघटनेची दर्पोक्ती
काश्मीर रेझिस्टन्स फ्रंट (KRF) या दहशतवादी संघटनेने अहमद सालार नावाच्या एका दहशतवाद्याचा ऑडिओ संदेश जारी केला आहे. या ऑडिओमध्ये, सालार पोलीस आणि सुरक्षा दलांना धमक्या देत असून दहशतवाद्यांची घरे पाडल्याबद्दल बदला घेण्याची चेतावणी यातून देण्यात आली आहे. “उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येक घरासाठी, एक घर लक्ष्य केले जाईल आणि प्रत्येक बाधित कुटुंबासाठी, त्यांच्या कुटुंबांना लक्ष्य केले जाईल.” “हे सुरक्षा दलांनी सुरू केले होते; आम्हीच ते संपवू.” असे ऑडिओ क्लिप मध्ये बोलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वी ही अशाच प्रकारे प्रत्युत्तर दिले होते, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात राजीनामे देण्यात आले होते.
मात्र आता परिस्थिती पूर्णता: वेगळी असून पाकिस्तानात लपून पोकळ धमक्या देणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकांना आता कुणीही भीक घालणार नाही, असा सुरूही कानी पडतो आहे. त्यामुळे असल्या धमकी आणि वल्गनांना भारतीय सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर दिलं जावं, हीच प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांमधून गोळीबार सुरूच
दुसरीकडे पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी होत आहेत.
अशातच 27-28 एप्रिल 2025 च्या रात्री, कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी विनाकारण लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केलाय. याला भारतीय सैन्यानेही जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले असल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. निवेदन सादर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.