पिंपरी : व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ विजेता कुस्तीगीर विक्रम शिवाजीराव पारखी (३०) यांचा मृत्यू झाला. हिंजवडीतील एका व्यायामशाळेत बुधवारी सकाळी ही घटना घडली.
विक्रम व्यायाम करीत असतानाच सकाळी साडेआठच्या सुमारास चक्कर येऊन खाली कोसळले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मुळशीतल्या माणगावचा सुपुत्र असलेल्या विक्रम यांनी २०१४ साली ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ जिंकून मानाची गदा मिळवली होती. झारखंडच्या रांचीमध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक पटकाविले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात असून हृदयविकाराच्या झटक्याने विक्रम यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक कन्हैया थोरात यांनी दिली.
विक्रम यांचा १२ डिसेंबर रोजी विवाह होणार होता. असे असताना अकस्मात काळाने घाला घातल्याने पारखी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विक्रम यांचे वडील शिवाजीराव पारखी निवृत्त सैनिक असून, त्यांनी १९९९ च्या कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. विक्रम यांच्या पश्चित आई, वडील, विवाहित भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.
३० वर्षांपुढील व्यक्तीने अगोदर हृदयाची तपासणी करून घेऊन व्यायामाची (जीम) सुरुवात करावी. जेणेकरून अतिजोखमीची लक्षणे समजतील.
डॉ. अभयचंद्र दादेवार, अतिरिक्त आरोग्य वैद्याकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका