
राजगुरुनगर : दोन अल्पवयीन मुलींची हत्या करून त्यांचे मृतदेह पाण्याच्या पिंपात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना राजगुरूनगरमध्ये उघडकीस आली आहे. दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय असून पोलिसांनी आरोपीला गुरुवारी पुण्यातून अटक केली.
या दोन मुली बुधवारी दुपारी घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या पालकांनी संध्याकाळी खेड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली. त्यांचा शोध सुरू एका बीअर बारजवळील खोलीत पाण्याच्या पिंपांमध्ये दोघींचे मृतदेह आढळून आले. शेजारी राहणाऱ्या एका आचाऱ्याने दोघींवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या केल्याचा संशय आहे. हत्या करून आरोपी पुण्याला पळून गेला व एका लॉजमध्ये लपून बसला होता. पोलिसांनी गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास त्याला अटक केली. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून शवविच्छेदन अहवालातून अधिक माहिती हाती येईल, असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले. दोघींवर अत्याचार झाला होता का, हेदेखील त्यानंतरच स्पष्ट होईल असे ते म्हणाले.
