
शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाला थेट विमानातून परत आणल्याची थरारक घटना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. ऋषिराज सावंत बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड विमानात बसला होता, मात्र कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी आपल्या सर्व राजकीय संबंधांचा वापर करत मुलाला हवेत उडणाऱ्या विमानातून परत आणले.
तानाजी सावंत यांच्या कुटुंबात काही दिवसांपासून वाद सुरू होते, ज्याचा परिणाम म्हणून ऋषिराज सावंत बँकॉकला जाण्याच्या तयारीत होता. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी त्याने चार्टर्ड विमान बुक केले होते, मात्र त्यावरून आधीच घरात मोठा वाद झाला होता. तरीही त्याने आपल्या मित्रांसह पुण्यातील लोहगाव विमानतळावरून विमानात प्रवेश घेतला. मुलाने ऐकण्यास नकार दिल्याचे लक्षात आल्यानंतर तानाजी सावंत यांनी वेगळी रणनीती आखली.
तानाजी सावंत यांना त्यांच्या चालकाने सांगितले की ऋषिराज विमानतळावरून उड्डाण करीत आहे. त्याच वेळी, त्यांनी त्वरित पुणे पोलिसांशी संपर्क साधला आणि अधिकृतरीत्या सिंहगड पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली.
तानाजी सावंत यांनी आपल्या सर्व राजकीय संबंधांचा उपयोग करत केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला. विमान आधीच बंगालच्या उपसागरावर उड्डाण करत असताना हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष (ATC) द्वारे चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाशी संपर्क साधण्यात आला. ATC ने वैमानिकाला विमान परत आणण्याच्या सूचना दिल्या आणि ऋषिराजला याचा काहीच अंदाज लागला नाही.
अखेर वैमानिकामे विमान पुण्याच्या दिशेने वळवळे, आश्चर्याची बाब म्हणजे तानाजी सावंत यांच्या मुलाला याचा थांगपत्ता देखील नव्हता. विमान जेव्हा लोहगाव विमानतळावरील धावपट्टीवर लँड झाले, तेव्हा विमानातून उतरताच ऋषिराज सावंतला मोठा धक्का बसला. आपण पुन्हा पुण्यात उतरलोय यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. संपूर्ण घटनाक्रम हा एखाद्या चित्रपटात शोभेल असा होता. त्यामुळे आगामी काळात या सगळ्या घटनाक्रमावर एखादा चित्रपट आला तर आश्चर्य वाटणार नाही.
)



