पिंपरी, दि. 30 (प्रतिनिधी) – पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकामध्ये शुक्रवारी, (दि. 30) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अपघात झाला. डंपरने एका दुचाकीला धडक दिली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
https://maharashtramaza.online/?p=166627
पूनम सचेत राठोड (रा. यश संकुल सोसायटी, पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पुनम त्यांच्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी दुचाकीवरून जात होत्या. कोकणे चौकात विरुद्ध दिशेने जात असताना एका डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी औंध येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
चौकात कायम वाहतूक कोंडी
कोकणे चौक हा कायम रहदारी असलेला चौक आहे. या चौकामध्ये सिग्नलचा अभाव असून आजूबाजूला बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात. त्यातच या परिसरात शाळा असल्याने विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी पालकांच्या तसेच शाळांच्या वाहनांची रांग असते. यामुळे चौकात नेहमी वाहतूक कोंडी होते.




