ठाणे: आनंद दिघे हे महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा त्यांच्या पद्धतीने बंदोबस्त करायचे आणि आज त्याच पद्धतीने हा न्याय चिमुकल्या दोन मुलींना मिळाला आहे. हा न्याय आनंद दिघे यांचे शिष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यात मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली. ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या समाधीस्थळावर खासदार नरेश म्हस्के यांच्यासह शिवसैनिकांनी एकत्र येऊन अक्षय चकमकीत ठार झाल्याबद्दल आनंद साजरा केला. त्यावेळी नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिल्यास आनंद दिघे यांच्या काळात त्या स्त्रीला तात्काळ न्याय मिळायचा. त्याच पद्धतीने यावेळेसही तात्काळ निसर्गाने हा न्याय दिलेला आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या या ठाणे जिल्ह्यात जी क्रुर घटना घडली. त्या आरोपीला नियतीने न्याय दिलेला आहे. आनंद दिघे यांचा एक शिष्य या शासनामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम पाहतोय, त्यांच्या काळात या चिमुकल्यांना न्याय मिळाला आहे. आज, आनंद दिघे असते तर, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ थोपटली असती, असे वक्तव्य नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना केले.



