- बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात झालेला मृत्यू दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी
- विधिमंडळातील सहकारी आणि सर्वसामान्यांचा नेता गमावला
मुंबई, दि. 12 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिदक्की यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.