मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आता या प्रकल्पालगतच्या ११७ गावांचा सर्वांगीण विकास ‘एमएसआरडीसी’च्या माध्यमातून साधला जाणार आहे. या ११७ गावांमध्ये दोन आर्थिक विकास केंद्रे विकसित केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने या ११७ गावांसाठी ‘एमएसआरडीसी’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबत १० ऑक्टोबरला नगरविकास विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
‘एमएसआरडीसी’ने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी १७२ किमीचा आणि ११२ मीटर रुंदीचा पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली असून नुकतीच या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी एमएसआरडीसी पुणे रिंग रोड लिमिटेड या नावाने विशेष कंपनीची स्थापना करण्यात आली. दुसरीकडे आता या प्रकल्पालगतच्या ११७ गावांच्या विकासाची जबाबदारी एमएसआरडीसीवर सोपविण्यात आली आहे. प्रकल्पालगतच्या गावांमध्ये आर्थिक विकास केंद्र उभारण्याची तयारी दर्शवत यासंबंधीचा प्रस्ताव एमएसआरडीसीकडून नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आखत्यारीतील ६६८ चौ. किमी क्षेत्रफळावरील हवेली भोर, पुरंदर तालुक्यांतील ६२ गावांमध्ये एक आणि हवेली, मुळशी, वेल्हे तालुक्यांतील ५५ गावांमध्ये एक अशी दोन आर्थिक विकास केंद्र विकसित करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी या प्रस्तावाद्वारे करण्यात आली होती.
११७ पैकी काही गावे…
- हवेली भोर तालुका : गोगलवाडी, भांबवडे, केंजळ, खडकी, मोरवाडी, निगडे, पांडे, पांजळवाडी, राजापूर, उंबरे, देगाव, खोपे, केळवाडी, कुसगाव, माळेगाव, रांजे, सालवडे, सोनवाडी, विरवाडी.
- पुरंदर तालुका : कोडीत खुर्द, पुर, पोखर, वारवाडी, मिसळवाडी, थापेवाडी, भिवरी, भिवडी, पाथरवाडी, पिंपळे, पानवडी, हिवरे, चांबळी, गारडे.
- हवेली तालुका : माळखेड, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, खडकवाडी, माणेरवाडी, खानापूर, गोरे खुर्द, भगतवाडी, जांभळी, घेर सिंहगड, खाडेवाडी, सोनापूर, वरदाडे, मोगरवाडी.
- मुळशी तालुका : मुठे, बोरटवाडी, आडगाव, खरवडे, वाजले, डावजे, वेडे, चिंचवड, चिखली बुद्रुक, बेलावडे, मोरेवाडी, दरवळी, भरेकरवाडी, टेमघर, खेचरे.
- वेल्हे तालुका : वरसगाव, कुरण बुद्रुक, मोसे बुद्रुक, साईव बुद्रुक, ओसाडे, निगडे मोसे.




