

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळं राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसेची साथ घेणार या चर्चेला उधाण आलं आहे. अशातच पुण्यातील बॅनरबाजीनं सर्वांचे लक्ष वेधलं आहे. दोन्ही भावांनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्त्यांकडून साद घालण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बराचवेळी चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अमित ठाकरे यांना विधानपरिषदेवर आमदार करुन भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेची साथ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अशातच, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
पुण्यातील टिळक रोडवर सैनिक प्रकाश गायकवाड यांच्या वतीने बॅनर झळकवण्यात आलं आहे. आमचे दैवत म्हणत, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र असलेला फोटो बॅनरवर लावला असून, ‘महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.’ अशा मजकूरसुद्धा बॅनरवर देण्यात आला आहे. त्यामुळं पुणेकरांसह राजकीय वर्तुळात हे बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.
दोन महिन्यांपूर्वी राजकीय वर्तुळात ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे या दोघांमध्ये संवादही झाला. त्यानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात आले. इतकेच काय तर खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भाऊ आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल. असं वक्तव्य केलं होत.
