ठाणे – संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मदत करण्यात आली आहे. मागील आठवड्यात त्यांनी आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांच्यावर 32 लाख रुपयांचं कर्ज होतं आणि याच विवंचनेत त्यांनी आत्महत्या करून आपला जीव दिला होता. या कर्जाच्या बाबतीत त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये खुलासा केला होता. या संपूर्ण प्रकारामुळे देहूमध्ये मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात होती.
संत तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष मोरे यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्रभरात हळहळ व्यक्त केली जात होती. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेल होतं. याचवेळी एकनाथ शिंदे यांनी शिरीष मोरे यांच्या कुटुंबीयांना ही मदत पोहोचवण्याचे आदेश आमदार विजय शिवतारे यांना दिले आहेत. आत्महत्या करण्याच्या आधी शिरीष मोरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये मित्रमंडळींना, कुटुंबीयांना मदत करण्याचं आवाहन केलेलं होतं. यात आवाहनाला प्रतिसाद देत एकनाथ शिंदे यांनी ही मदत पक्षातर्फे केली जात असल्याचं सांगितलं आहे.




