
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शरद पवारांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आल्यामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर तोफ डागत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळं राज्यात, राजकारण चांगलेच तापलं आहे. या वरुन राऊतांवर अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. अशातच आता या मैदानात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उतरले आहेत. ‘तुम्हाला मराठा सन्मान काय कळणार?’ असा सवाल त्यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे. मात्र, त्यांच्या या ट्विटला राऊतांनी इतिहासाचा दाखला देत प्रत्युत्तर दिलं आहे.
शिंदेंना दिलेल्या पुरस्करावरुन रंगले ट्विटर वॉर
मराठा समाज सगळं पाहत आहे! बाळासाहेब ठाकरे यांचे आदर्श नाकारणारे आणि केवळ हिंदुत्वाचाच नव्हे तर मराठा स्वाभिमानाचाही अपमान करणारे लोक मराठा सन्मानाबद्दल काय समजतील? अशी विचारणा करत ज्योतिरादित्य शिंदेंनी, ज्यांनी स्वतःच्या समाजात आपला आधार आणि आदर गमावला आहे, त्यांना इतरांच्या आदराचे दुःख होत आहे. असा टोला राऊतांना लगावला.
शिंदेंच्या या ट्विटनंतर राऊतांनी त्यांच्या आरोपाचा समाचार घेतला.
“महाराज, इतिहास समजून घ्या. ज्योतिरादित्यांनी महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. महादजी शिंदे वीर होते. त्यांनी दिल्लीपुढे कधी लोटांगण घातलं नाही. दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही. हे जरा आताच्या महाराजांनी समजून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी म्हणणं नाही. कुणाच्या नावाने देताय याला विरोध आहे. तुम्ही महादजी शिंदे यांची प्रतिष्ठा कमी केली आहे. तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करत आहात. एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करत आहे. तुम्ही जयाजीराव शिंदे यांच्या नावाने पुरस्कार द्या. आमचं काही म्हणणं नाही.” असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.
दोन्ही नेत्यांमधील वाद पाहता आणि राज्यात सुरु असणाऱ्या आरोपांच्या फैरी पाहता हे प्रकरण चांगलचं गाजणार असल्याची कुजबूत राजकीय गोटात सुरु आहे.
