देहूगाव, ता. १९ मे – देहूगावमधील परंडवाल चौक ते झेंडेमळा दरम्यान दररोज सुमारे ४ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. विशेष म्हणजे या दरम्यान दोन रुग्णवाहिका तब्बल अर्धा तास अडकून राहिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. हा चार किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 40 मिनिटे लागतात त्यामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत.
देहू ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू होईल असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी दिले होते. मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणतीही हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
वाहतूक कोंडी, रस्त्यांची दयनीय अवस्था आणि वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना दररोज कामावर, शाळांमध्ये किंवा दवाखान्यांमध्ये पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक स्थानिकांनी ही परिस्थिती सहन न झाल्यामुळे देहूगाव सोडण्याचा विचार सुरू केला आहे, अशी माहिती काही नागरिकांनी दिली.
या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्यात यावा, रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच पालखी मार्गाचे काम हजारो कोटी रुपये खर्च करून होत असताना श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी निघते त्याच देहू नगरीच्या रस्त्याची अशी दयनिय अवस्था असल्यामुळे वारकरी संप्रदाय ही नाराज आहे. त्यामुळे 17 जून रोजी होणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.