- टाकाऊतून टिकाऊ’ चा पर्याय कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल – कुंदाताई भिसे..
पिंपरी दि. १७ जुलै :– उन्नति सोशल फाउंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे यांच्या वतीने पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांसाठी विविध समाजोपयोगी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु बनवणे, चित्रकला, निबंध स्पर्धांचा समावेश होता.
या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आज रविवारी (दि. १७) रोजी सायं. ४ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पाडला. यावेळी उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक संजय भिसे, डॉ. सुभाषचंद्र पवार, रमेश वाणी, दिलीप नेमाडे, रोशन रासने, प्रणय शहा. सुरेश वाघळकर, अरविंद पाटील, सुभाष पाटील, रमेश सोनवणे, एस टी निकम, प्रि. दिनेश शाह तसेच उन्नति सोशल फाउंडेशन, विठाई वाचनालय, लिनेअर सोशल ग्रुप, ऑल सिनियर सिटिझन असोसिएशन चे बहुसंख्य सदस्य आणि सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेत तब्बल दोनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रथम, द्वितीय, आणि तृतीय स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिहिका गोटमारे, द्वितीय अदिती कुंभार आणि तृतीय क्रमांक यशस्वी भोसले यांनी पटकाविला. टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु या विषयात प्रथम सिद्धी पाटील, द्वितीय मीनल अग्रवाल, आणि तृतीय क्रमांक आरोही शहाने पटकाविला. निबंध स्पर्धेत पूर्वा सोनवणे हीने प्रथम, प्रियांका पाटील द्वितीय तर तृतीय क्रमांक कीर्ती फिरके हिने पटकाविला.
सौ. कुंदाताई भिसे म्हणाल्या उन्नती सोशल फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून पिंपळे सौदागरमध्ये विधायक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या हातभार लावीत आहे. आपला परिसर स्मार्ट होण्यासाठी पालिकेच्या बरोबरच खांद्याला खांदा देत नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे.
यंदा वर्धापन दिनी परिसरातील नागरिकांसाठी स्पर्धांचे आयोजन केले होते. यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. चित्रकला आणि निबंध स्पर्धेत स्पर्धकांनी पर्यावरण या विषयावर आपली अभिव्यक्ती व्यक्त करीत सामाजिक जबाबदारीचे भान जपले. त्यातून त्यांचा कल दिसून आला. सध्या कचऱ्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या रोखण्यासाठी आपण आपल्या घरातूनही हातभार लावू शकतो. आपल्या घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘टाकाऊतून टिकाऊ’चा पर्याय अधिक कल्पकपणे अवलंबून आपणही कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल टाकू शकतो, असा संदेशही स्पर्धकांनी उपक्रमाच्या माध्यमातून दिला आहे.
उन्नती सोशल फाउंडेशनचा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर असतो. लहान मुलं, युवावर्ग, महिला, जेष्ठ नागरिक यांचे कलागुण जोपासण्याचे उन्नतीचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.




