नाशिक – शहरातील डेअरी पॉवर या कंपनीने अतिशय अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. एकाचवेळी तब्बल १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही 300 ही कार भेट देण्यात आली आहे. त्यामुळे ही बाब या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसह इतरांसाठीही आनंद आणि प्रेरणादायी ठरली आहे.
दूध आणि दूग्धजन्य उत्पादने तयार करणाऱ्या डेअरी पॉवर या कंपनीने आपल्या १२ कर्मचाऱ्यांना महिंद्रा एक्सयुव्ही ३०० या कारचे गिफ्ट दिले आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. आपल्या गुरुविषयी आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. कंपनीचे सर्व कर्मचारी हे कंपनीसाठी गुरुच आहेत, अशी भावना व्यक्त करीत कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी संचालक दिपक आव्हाड यांनी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे.
प्रत्येक माणसाकडे घर, गाडी आणि पैसा हे असणं आवश्यकच आहे. माझ्या प्रत्येक माणसाकडे गाडी असणं ही काळाची गरज आहे. ही संधी मला कुणी दिली नाही म्हणून मी या सदस्यांना दिली आहे. जर एक दिपक आव्हाड उभा राहिला तर आज ७५० लोकं उभे राहतात, तर असे जवळपास मला १०० दिपक आव्हाड उभे करायचे आहेत. तरच आपण नाशिकसाठी काहीतरी परिवर्तन घडवू शकू असा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, नाशिकचं नाव सगळीकडे पोहोचवणं, तसेच वर्तुळ व्यवसाय धोरण वापरून नाशिकचा पैसा हा नाशिक मध्येच कसा राहील या साठी मी नेहमी प्रयत्नशील असतो असं त्यांनी सांगितले.



