नवी दिल्ली : कोरोना मंदीतून जग सावरत असताना भडकलेले इंधनदर आणि महागाईचा चढता आलेख यात आज, सोमवारपासून केंद्र सरकारने वाढवलेल्या वस्तू आणि सेवाकराची भर पडणार आहे. वेष्टनातील अत्यावश्यक अन्नपदार्थ ते खासगी रुग्णालयांतील उपचार अशा अनेक महत्त्वाच्या बाबी महाग वस्तूंच्या यादीत समाविष्ट होत आहेत.
दैंनदिन वापरातील पीठ, पनीर, दही यांसारखे वेष्टनांकित आणि लेबल (खूण पट्टी) लावलेले खाद्यपदार्थ आतापर्यंत ‘जीएसटी’मुक्त होते, परंतु आजपासून त्यांवर पाच टक्के जीएसटी भरावा लागेल. त्याचबरोबर रुग्णालयातील पाच हजारांहून अधिक भाडे असलेल्या खोलीसाठीही पाच टक्के जीएसटी भार रुग्णांवर पडणार आहे. म्हणजे खासगी रुग्णालयांतील उपचारही महाग होणार आहेत.
नवीन वस्तू आणि सेवांवर कर आकारणीमध्ये एक हजार रुपयांपर्यंत भाडे असलेल्या रुग्णालयातील खोलीचे भाडे, नकाशे, चार्ट्स यांच्यावर १२ टक्के, तर टेट्रापॅकमधील पदार्थ आणि बँकांमार्फत खातेदारांना देण्यात येणारे धनादेश (पुस्तिका किंवा सुटे चेक) यांच्या शुल्कावर १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.
छपाई, लेखन किंवा शाई, वस्तरे, चाकू आणि पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवे, रेखांकन आणि चिन्हांकन साधने यांच्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. सौरऊर्जेवरील वॉटर हीटरवर पूर्वी ५ टक्के जीएसटी भरावा लागत होता, तो आता १२ टक्के करण्यात आला आहे. ट्रक किंवा मालवाहने भाडय़ाने घेणे मात्र स्वस्त झाले असून त्यावरील जीएसटी १८ वरून १२ टक्के एवढा कमी करण्यात आला आहे.
रिझव्र्ह बँक, भारतीय विमा नियामक विकास प्राधिकरण (आयआरडीए) आणि सेबी यांसारख्या नियामक संस्थांच्या सेवांवर १८ टक्के कर आकारण्यात येणार आहे. जैव-वैद्यकीय कचराप्रक्रिया सुविधांवर १२ टक्के जीएसटी लागू होईल, तर प्रतिदिन पाच हजार रुपयांपेक्षा जास्त भाडे असलेल्या रुग्णालयातील साध्या खोलीसाठी आकारलेल्या भाडय़ाच्या मर्यादेपर्यंत इनपुट टॅक्स क्रेडिटशिवाय ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.




