पिंपरी चिंचवड शहरातील मिळकतदारांच्याकडून आज अखेर मागील आणि चालू आर्थिक वर्षातील एकूण 321 कोटी एवढा कर वसूल झाला आहे. कर संकलन विभागाच्या चार विभागीय कार्यालयातून चालू वर्षात मागील थकीत आणि चालू आर्थिक वर्षातील मिळकतकर संकलनाचा दोन अंकी आकडा ही गाठता आलेला नाही. प्रभावी कामकाज होत नसल्याने ही कार्यालय पिछाडीवर फेकली गेली आहेत. यामुळे कर संकलन विभागाला थकीत कर वसुलीत फटका बसला आहे. आत्तापर्यंत 631 कोटी थकीत कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या प्रशासनात दमछाक होताना दिसत आहे.
शहरातील विविध विभागीय कर संकलन कार्यालयाकडून व महापालिकेतील मुख्य कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडे हा कर जमा केला जातो. शहरात एकूण १७ विभागीय कर संकलन कार्यालय कार्यरत आहेत. यामध्ये निगडी प्राधिकरण, पिंपरी, चरोली व तळवडे या चार संकलन कार्यालयाचे कामकाज खिचडीवर आहे. या चार कार्यालयातील प्रशासनाला चालू वर्षात दोन अंकी आकडा गाठता आला नाही.
कर न भरणे ही काही लोकांची मानसिकता असते. त्यांना नोटीस देणे किंवा मिळकत कर जप्तीची कारवाई करणे ही प्रशासकीय तरतूद आहे. त्यानुसार कामकाज सुरू आहे. त्यामुळे शहरातील थकीत मिळकतकर वसुली करण्यासाठी कर संकलनाच्या सर्व विभागीय कार्यालयाकडून युद्ध पातळीवर कामकाज सुरू आहे. काही ठिकाणी कर संकलनात येणाऱ्या अभ्यासाच्या परिस्थिती याला कारणीभूत ठरत आहेत.
निलेश देशमुख (सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग.)



