पिंपरी चिंचवड शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिकाऊ परवाना मिळणार आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. शहरातील ग्रामीण भागातील आठ महाविद्यालयामध्ये शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक जनजागृती होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या हातात वाहनाची चावी आल्यानंतर वाहने सोसाट चालवत वाहतूक नियमांचा सर्रास भंग केला जात आहे. वाहतूक नियमाबाबत जागरूकता व्हावी या उद्देशाने आरटीओ कार्यालयाकडून महाविद्यालयात कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. यात वाहतूक नियमाबाबत जनजागृती केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना शिकाऊ परवाना मिळवण्यासाठी आरटीओ कार्यालयात रांगेत उभे राहावे लागते. एका प्रक्रियेत परवानेची काम होत नसल्याने वारंवार हेलपाटे मारावे लागतात. अनेकदा विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सुट्टी घेण्याची वेळ येते. मात्र आता महाविद्यालयातच शिकाऊ परवाना मिळण्याची सोय होणार असल्याने विद्यार्थ्यांचा त्रास वाचणार आहे. महाविद्यालयामध्ये आपण शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना परवाना देण्याची सुविधा देणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर आठ महाविद्यालय घेतली जातील. त्यानंतर ज्यांची इच्छा आहे त्यांनी अर्ज करावे. त्या ठिकाणी शिबिर घेण्यात येईल.
अतुल आदे (उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड.)




