मुंबई – महाराष्ट्रातील १० टक्के कमिशन खोरीवर स्वतःचा बुलबुल वाजविणाऱ्यांनी गुजरातच्या ड्रग्जच्या तस्करीचा पैसा कोठे जातोय यावर बॅण्डबाजा वाजवायला हवा. या पैशाचे धनी कोण, हे भाजपच्या पोपटांनी जाहीर करावे. ‘सी समरी’ करून प्रकरण दाबावे असा हा विषय नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा, तरुण पिढीला वाचविण्याचा हा विषय आहे. गुजरात तुमच्याइतकाच आमच्याही भावनेचा विषय आहे. आमच्या जुळय़ा भावास पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तानमधील ड्रग्ज माफियांच्या ताब्यात कसे जाऊ द्यावे? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला विचारला आहे.
तसेच गुजरातला बदनाम करण्याचे कारस्थान काही लोक करीत असल्याची भीती पंतप्रधान मोदी यांनी भूजच्या एका कार्यक्रमात व्यक्त केली. गुजरातची बदनामी घरातलेच लोक करीत आहेत. शोधा म्हणजे सापडेल. गेल्या ५ वर्षांत आपल्या देशात अब्जावधीचे ‘ड्रग्ज’चे साठे जप्त करण्यात आले. हे साठे पकडण्यात आले, पण जे पकडले गेले नाहीत ते अमली पदार्थांचे साठे देशभरात तरुण पिढी उद्ध्वस्त करीत असतील.
आपल्या देशात ७२ वर्षांनंतर नामिबियातून आठ चित्ते आणले गेले. त्या उत्सवातून आपले सत्ताधारी बाहेर पडले असतील तर त्यांनी देशात धो-धो येणाऱ्या अमली पदार्थांच्या साठ्यांकडे गांभीर्याने पाहायला हवे असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
‘उडता पंजाब’ने सगळय़ांचीच झोप उडवली आहे. त्यापाठोपाठ गुजरात राज्यात सर्वाधिक अमली पदार्थांचे साठे पकडले जात आहेत. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ परदेशींच्या पोटातून १०० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. जेथून आठ चित्ते आले त्याच आफ्रिका व आसपासच्या प्रदेशातून हे परदेशी पाहुणे पोटात ड्रग्ज घेऊन आले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज माफियांनी गुजरातमार्गे हिंदुस्थानात घुसखोरी केली आहे. मागील सहा महिन्यांत गुजरातच्या किनारपट्टीवर 30 हजार किलोचे ड्रग्ज पकडण्यात आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५ हजार कोटी आहे. ड्रग्ज माफियांवर गुजरातचे सरकार कोणतीच कारवाई करीत नाही. हेच ‘गुजरात मॉडेल’ आहे
‘वेदांता-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवून नेताच महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची भावना व संताप व्यक्त झाला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर सांगितले, ‘‘गुजरातमध्ये फॉक्सकॉन गेला म्हणून काय बिघडले? गुजरात पाकिस्तानमध्ये आहे काय?’’ श्रीमान फडणवीस, तुमचा मुद्दा योग्य आहे. गुजरात पाकिस्तानमध्ये नाही, पण गुजरातमध्ये पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानशी संबंधित ‘ड्रग्ज माफिया’ टोळीचे कनेक्शन उघड झाले आहे.
भारत जोडो यात्रेस निघण्याआधी राहुल गांधी गुजरातला गेले व त्यांनी गुजरातमध्ये वाढत चाललेल्या नशेच्या कारभारावर हल्ला केला. ‘गुजरात हे ड्रग्जचे केंद्र बनलेय. मुंद्रा बंदरातून सगळय़ा ड्रग्जची तस्करी केली जातेय. डबल इंजिन सरकारमध्ये कोण बसलेय जे सातत्याने ड्रग्ज आणि दारू माफियांना संरक्षण देत आहे व गुजरातच्या युवकांना नशेबाजीत लोटत आहेत.
ड्रग्ज माफियांवर गुजरातचे सरकार कोणतीच कारवाई करीत नाही. हेच ‘गुजरात मॉडेल’ आहे’, असा घणाघात राहुल गांधींनी करताच त्यांची अक्कल काढली गेली. गुजरातमध्ये दहा हजार कोटींचा अवैध दारू व्यापार कोणाच्या संरक्षणात सुरू आहे, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारताच त्यांच्या दिल्लीतील मंत्र्यांवर छापे पडतात, पण गुजरातमध्ये सर्व सुरळीत चालते.


