नवी दिल्ली – जागतिक पातळीवर सोने व चांदीच्या दरात घसरण चालूच आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दारात घट होत आहे. यामुळे ग्राहकांच्या सोने चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात होणार आहे. दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचा दर ३४३ रुपयांनी कमी होऊन ५१, १०५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर १,०७१ रुपयांनी कमी होऊन ५८, ६५२ प्रति किलो झाला.
अमेरिकेत रोजगार निर्मिती वाढली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतही फेडरल रिझर्व्ह आक्रमक व्याजदर वाढ करण्याची शक्यता गृहीत धरण्यात येऊ लागली आहे. यामुळे अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्दे शांक रविवारपासून कोसळत आहेत. त्याचा परिणाम युरोप आणि आशिया खंडातील शेअर बाजारावर होत आहे. त्याचबरोबर शेअर बाजारासह सोने आणि चांदीतील गुंतवणूक अमेरिकेच्या कर्जरोख्याकडे जात आहे. कारण अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे.
त्यामुळे शेअर बाजाराच्या निर्दे शांकाबरोबरच सोने आणि चांदीचे दर जागतिक पातळीवर कोसळत आहेत. मात्र भारताच्या दृष्टिकोनातून समाधानाची बाब म्हणजे दिवाळीत बरेच लोक सोने खरेदी करतात. अशा परिस्थितीत सोन्याचे दर तुलनेने कमी पातळीवर आले आहेत.
मात्र जागतिक बाजारातील मंदी आणि विविध देशांदरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणामुळे शेअर बाजार निर्देशांकाबरोबरच सोने आणि चांदीचे दर आगामी काळात अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज ज्या संस्थेचे विश्लेषक दिलीप परमार यांनी सांगितले की, अमेरिकेत जास्त व्याज मिळत असल्यामुळे सोने आणि शेअर बाजारातील गुंतवणूक वळत आहे.



