मुंबई : आर्थिक गैरव्यवहार – प्रकरणात अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. आता या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्यायालयात सुरू आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या विरोधात याचिका दाखल केली होती. परंतु सर्वो च्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे सांगत अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



