कामशेत : शहराला ग्रामीण भागातील बुधवडी, वडिवळे, नेसावे, खांडशी, वळख, वेल्हवळी, सांगीसे, उंबरवाडी या गावांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदीवरील पुलाचे काम सुरू असून या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येत आहे. यासाठी पर्यायी रस्ता म्हणून या नवीन उभारण्यात येत असलेल्या पुला शेजारीच नदी पात्रात वाहतुकीसाठी मातीचा भराव करण्यात आला होता. मात्र, काल रात्री झालेल्या पावसामुळे इंद्रायणी नदीपात्रातून होणाऱ्या प्रचंड पाण्याच्या वीसर्गासमोर या मातीच्या भरवाचा निभाव लागला नाही.
सद्यस्थितीला या आठ गावांना कामशेत शहराशी जोडणाऱ्या पर्यायी मार्गाची अवस्था बिकट असून स्थानिकांना मुंढावरे मार्गे वळख या कच्च्या चिखलमय रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. या पर्यायी मार्गाची वेळीच दागडूजी होणे गरजेचे होते. मात्र, या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेने कानाडोळा केल्याने नागरिकांना सुमारे १५ ते २० किलोमीटरचा वळसा घालून उंबरवाडी मार्गे गोवित्री ते कामशेत असा प्रवास करावा लागणार आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत इंद्रायणी नदीवर वडिवळे गावच्या हद्दीमध्ये ७५ मीटर लांबीचा हा पूल निर्माणाधीन आहे या पुलाची अंदाजित रक्कम पाच कोटी ८५ लाख ४१ हजार इतकी असून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संघ पुणे यांच्या अंतर्गत हे काम सुरू आहे.
निसर्गाचा वारदहस्त लाभलेल्या नाणे मावळातील या भागांमध्ये अनेक पर्यटक दरवर्षी वर्षाविहारासाठी येतात या ठिकाणी पुलाचे काम सुरू असल्यामुळे तसेच पर्यायी इंद्रायणी नदी पात्रात केलेला मातीचा भराव वाहून गेल्याने यंदा पर्यटक परिसरात येण्याची शक्यता कमीच आहे यामुळे स्थानिकांचे अर्थचक्र अडचणीत येण्याची शक्यता आहे. या भागात अनेक तरुणांनी बंगले भाड्याने देणे तसेच हॉटेल व्यवसाय यामध्ये मोठी गुंतवणूक केलेली आहे. परंतु, पर्यटकच जर आले नाही तर येथील युवक आर्थिक विवंचनेत सापडू शकतो.




