पुणे मेट्रोचा महत्त्वाचा टप्पा शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे गुरुवारी (26 सप्टेंबर) लोकार्पण होणार होते. तसेच स्वारगेट ते कात्रज या विस्तारीत भुयारी मार्गाचे भूमिपूजन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. हा कार्यक्रम सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होता. मात्र मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला. मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गीकेचे लोकार्पण रखडलं. यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्यात मेट्रो उद्घाटनावरून राजकारण चांगलेच तापले आहे.
शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट मेट्रो मार्गिका अनेक दिवसांपासून लोकार्पणासाठी तयार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी ही मेट्रो मार्गिका तयार असूनही जनतेसाठी खुली करण्यात आलेली नाही. पावसाचे कारण देऊन पंतप्रधानांनी लोकार्पण सोहळा पुढे ढकलला आहे. जनतेच्या पैशातून निर्माण झालेली मेट्रो मार्गिका कोणा एका व्यक्तीच्या हट्टापायी वापराविना पडून राहणे योग्य नाही. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचं म्हणत महाविकास आघाडीने आज शिवाजीनगर जिल्हा न्यायालय येथे आंदोलन केलं. दरम्यान, पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (प्रशासन व जनसंपर्क) यांनी 29 सप्टेंबरला जिल्हा न्यायालय-स्वारगेट मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती दिली.