
विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये धक्क्यावर धक्के दिले होता. आता मात्र अजित पवार याची परतफेड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भोसरी विधानसभेतून याची सुरुवात होणार आहे. भोसरी विधानसभेवेळी शरद पवारांची तुतारीचा प्रचार केलेल्या विलास लांडेंनी आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याचं स्वतःचं जाहीर केलं आहे.
त्याचबरोबर भोसरी विधानसभेच्या निवडणुकीवेळी अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुंकलेले अजित गव्हाणे हे वीस माजी नगरसेवकांसह पुन्हा घड्याळ हाती घेणार आहेत. या संदर्भात अजित पवार आणि अजित गव्हाणेंचं बोलणं झाल्याचा दावा ही विलास लांडेंनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी स्वतःचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी आता पत्ते खुले करायला सुरुवात केली आहे.
विलास लांडे काय म्हणालेत?
अजित पवार यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये मोठं काम झालं. त्यावेळी वसंतदादा पाटील यांनी यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल उभं करण्यात फार मोठं योगदान दिलं आहे. हे सर्व फार जवळून पाहिलं आहे. काम करणारी माणसं अतिशय मोठी होती आणि त्यांचं काम आदराने घेणे गरजेचे आहे. यामध्ये अजित पवार यांचा देखील काम खूप मोठं काम आहे. यशवंतराव चव्हाण यांनी एमआयडीसी आणली नसती तर ही महानगरपालिका दिसली नसती. हे खेडेगाव असलं असतं. पण या मोठ्या लोकांनी हे शहर उभं करण्यामध्ये फार मोठं योगदान दिलं. महानगरपालिकेमध्ये 1992 पासून अजित पवार यांनी लक्ष दिले. तेव्हापासून या शहराचा चेहरा मोहरा बदलला गेला आणि त्याचं श्रेय फक्त अजित पवार यांना आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकी वेळी विलास लांडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचं याद्वारे त्यांनी सुचित केलं आहे.
अजित गव्हाणे आणि २० नगरसेवक परत येणार?
विधानसभेच्या आधी अजित गव्हाणे आणि 20 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात गेले होते. अजित गव्हाणे आणि नगरसेवकांनी विलास लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेतल्याचा देखील त्यांनी जाहीर केलेलं होतं. गेलेले सर्वजण पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये परत येणार आहेत का? या प्रश्नावर बोलताना विलास लांडे म्हणाले, अजित गव्हाणे यांनी जेव्हा तो निर्णय घेतला, तेव्हा सकाळी अजित पवार यांच्यासोबत मीटिंग झाली आणि संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत मीटिंग झाली. शरद पवार यांच्या मिटींगला मी नव्हतो. मी सांगितलं की दोन्ही नेते आपले आहेत. परंतु विश्वास पात्र राहील असं काम करा. कायमच बदनामी विलास लांडे यांची होते. आपल्याला या शहरांमध्ये कोणी ताकद दिली तर ती अजित पवारांनी दिली आहे. शरद पवार यांना माझ्या वडिलांनी देवघरात ठेवलेलं आहे. एक मोठा नेता, एक आपला बहुजन समाजाचा मोठा माणूस आणि त्यांची पूजा मी करतो. त्यांचं स्थान आमच्या मनात आहे. पण या शहरातल्या विकासाला अजित पवार यांनी गती दिली, असंही पुढे विलास लांडे यांनी म्हटलं आहे.
गव्हाणे आणि अजित पवार यांची फोनवरून चर्चा
अजित गव्हाणे आणि अजित पवार यांची फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती आहे, त्यावर बोलताना विलास लांडे म्हणाले, मला अजित गव्हाणे यांनी सांगितलं. मला अजित पवारांचा फोन आला होता. जर पक्षात आले तर सर्वांना एकत्र घ्या. त्यांनी आपल्यासाठी काम केलेलं आहे, त्यांना परत ताकद द्या त्यांना वाऱ्यावरती सोडू नका, असं मी अजित गव्हाणे यांना सांगितला आहे. अजित गव्हाणे यांनी त्यांच्या 20 नगरसेवकांसोबत चर्चा करून अजित पवारांसोबत जावं असं मला वाटत आहे. अजित गव्हाणे देखील इकडे येण्याची शक्यता आहे. आपण कोणत्या पक्षात गेलो नाही आपण फक्त पवारांना मानतो आहे. अजित पवार आपले पहिल्यापासूनचे नेते आहेत. त्यांनी या शहराचं काम केलेलं आहे. या शहराची ओळख अजित पवार यांच्यामुळे झालेली आहे. त्यामुळे आम्हाला ताकद मिळाली आहे आणि ते आम्ही विसरू शकत नाही, असंही पुढे विलास लांडे यांनी म्हटलं आहे. विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवार यांच्या गटात येणार आहेत अशा चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात राहिल्या आहेत. मात्र, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागलं आहे.
